यड्रावमधील अन्यायग्रस्त प्लाॅटधारक उग्र आंदोलनाच्या तयारीत
यड्राव : शिरोळ तालुक्यातील यड्राव हे गाव इचलकरंजी शहराला लागूनच असल्याने या गावाच्या हद्दीत औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. परिणामी येथे स्थायिक होणारे कष्टकरी, मजूर, कामगार वर्ग तसेच उद्योजक मोठ्या प्रमाणात येत आहे. सन २००२ ते २०१५ या कालावधीत प्रथमेश, संभव, पार्श्वनाथ, मॅंचेस्टर यांसारख्या विकसकांनी जमिनी घेऊन रितसर प्लाॅटींग करून विकसीत केल्या. आशा प्रकारचे प्लाॅटींग सर्वसामान्य लोकांना खरेदी करणे आवाक्याबाहेर गेल्याने, गोरगरिबांना परवडेल असे यड्राव हद्दीतील प्लाॅटींग खरेदी करून घराचे स्वप्न पहात असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी करून ७/१२ आणि डायरी उतारा नोंद रद्द करण्यास भाग पाडले. यामध्ये गोरगरीब, कष्टकरी प्लाॅटधारकांचे हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न भंग पावले. त्याचबरोबर गट नंबर ५०५,५०६ मधील सर्वसामान्य कष्टकरी आहेत. असे असताना शिरोळ तहसीलदार यांनी दिनांक १०/१०/२०२४ रोजीच्या पत्रानुसार गट नंबर ५०५,५०६ मधील एकूण ३९ प्लाॅट पैकी फक्त २५ प्लाॅटचे फेरफार नोंदी रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे. सदरील कारवाई ही सुडबुध्दीने केल्याचे यातून दिसून येते.
ज्या तक्रारदाराने तक्रार केली त्याने विकासकावर कारवाई करण्याचे सोडून सर्वसामान्य प्लाॅटधारकांचेवर कारवाई केली आहे, यामागचा *”अर्थ”* समजत नाही. त्यामुळे तक्रारदाराबाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याची परिणती म्हणून जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार आणि ग्रामपंचायत यड्राव यांचे प्लाॅटधारकांचेवर जी कारवाई केली तीच कारवाई यड्राव हद्दीतील ज्या ज्या गटात ओपन स्पेस सोडलेला नाही त्या गटातील सर्व ७/१२, डायरी उतारा, फेरफार नोंदी रद्द करण्यात याव्यात, असे नमुद करण्यात येत आहे.
यासाठी सर्व अन्यायग्रस्त सर्वसामान्य प्लाॅटधारकांनी एकत्रित येत आंदोलन, उपोषण, आत्मदहन यांसारखे उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
🔲 श्री. संजय बाबासो पाटील, रा. विक्रम नगर, इचलकरंजी यांनी सदरच्या फेरफार बाबतीत तक्रार दाखल केली होती. सदरील तक्रार त्यांनी मागे घेऊन सुद्धा तहसीलदार यांनी कारवाई सुरू ठेवली आहे. याबाबत सुध्दा प्लाॅटधारकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे.*