कणेरी मठावर मोर्चा घेऊन येणाऱ्यांचा फुसका बार… अनेक गावातील लोक घेणार होते समाजकंटकांचा खरपूस समाचार..
कोल्हापूर,(अविनाश शेलार यांजकडून):- कोल्हापूर येथील कणेरी मठावर दोन दिवसांपूर्वी सतीश कांबळे, बाबा इंदुलकर, विजय देवणे, आर.के.पोवार, दिलीप पवार, बाबुराव कदम, चंद्रकांत यादव, व्यंकप्पा भोसले, इर्शाद फरास, सुनील देसाई यांनी कणेरी मठावर झालेल्या संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कणेरी मठावर विनाकारण आक्षेप घेत केवळ मठाची बदनामी करण्याच्या द्वेषातून मठावर गुरुवार दिनांक 13 रोजी मोर्चा घेऊन येण्याची वल्गना प्रसिद्धी माध्यमातून केली होती. त्याच्या प्रत्युत्तरा दाखल कणेरी मठावर पिढ्यानपिढ्या श्रद्धा असणाऱ्या मठाच्या जवळपासच्या 20 ते 25 गावातील लोकांनी पोलीस प्रमुख यांना मंगळवारी भेटून मठाची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निवेदन दिले होते .शिवाय त्यांच्या मोर्चाला आपण नक्की समोर जाऊ असे सुद्धा ग्रामस्थ या ठिकाणी सांगून आले होते . तसेच भागातील शेकडो महिलांनी हि कणेरी मठाची बदनामी करणाऱ्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे स्वतंत्र निवेदन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर गायकवाड यांच्याकडे दिले आहे . आज गुरुवार दिनांक 13 रोजी ही मंडळी मोर्चा घेऊन कणेरी मठावर येणार असे समजल्यावर या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासूनच कणेरी मठावर अनेक गावातील ग्रामस्थांची रीघ लागली होती .यामध्ये कोगील खुर्द ,कोगील बुद्रुक ,कंदलगाव, शेंडुर ,गोकुळ शिरगाव, एकोंडी, कणेरी ,कणेरीवाडी, तामगाव एमआयडीसी औद्योगिक वसाहती मधील टेम्पो चालक संघटनांसह आजूबाजूच्या २५ गावातील लोक सकाळी कणेरीच्या सीमेवरती ठाण मांडून बसले होते. यावेळी पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणी जमलेल्या सर्व गावातील ग्रामस्थ यांनी विनाकारण मठाची बदनामी करणाऱ्या व मोर्चा घेऊन येणाऱ्यांचा यथोचित समाचार घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे असून त्यांची आम्ही वाटच पाहत आहोत असा सूर या ग्रामस्थांनी घेतला होता. जवळपास नऊ वाजल्यापासून मोर्चाची वाट पाहत बसलेले ग्रामस्थ दुपारपर्यंत कणेरीच्या शिवेजवळ व सर्व मार्गांवर थांबून होते. पण दुपारपर्यंत कोणीही न आल्याने या ग्रामस्थांनी शेवटी ‘जय श्रीराम, हर हर महादेव व मठाची बदनामी करणाऱ्यांचे करायचे काय , खाली डोके वर पाय’ अशा घोषणा देऊन हे सर्व ग्रामस्थ दुपार नंतर माघारी फिरले. यावेळी केवळ द्वेषातून मठाची बदनामी करणाऱ्या समाजकंटाकांचा बार फुसका निघाल्याच्या चर्चा दिवसभर परिसरात होत्या.