आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स आघाडीवर तर दिव्या सोम्या,भक्ती व अश्ना द्वितीय स्थानावर

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स आघाडीवर तर दिव्या सोम्या,भक्ती व अश्ना द्वितीय स्थानावर

     

    कुंभोज,दि.1 वार्ताहर(विनोद शिंगे) :- संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे चालू असलेल्या 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीनंतर चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स साडेपाच गुणासह आघाडीवर आहे तर गतविजेती द्वितीय मानांकित आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर नागपूरची दिव्या देशमुख, तृतीय मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सोम्या स्वामीनाथन, अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय मास्टर गोव्याची भक्ती कुलकर्णी व कालपर्यंत आघाडीवर असलेली मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर अश्ना मखीजा या चौघीजणी पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतिका अग्रवाल, सहावी मानांकित रेल्वे स्पोर्ट्स बोर्डची एम महालक्ष्मी, आठवी मानांकित महाराष्ट्राची, आंतरराष्ट्रीय महिला मास्टर साक्षी चितलांगे नववी मानांकित कर्नाटकची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर इशा शर्मा, दहावी मानांकित पश्चिम बंगालची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर अर्पिता मुखर्जी व 25 वी मानांकित आयुर्विमा महामंडळची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे या सहा जणी साडेचार गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहे.
    जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या या स्पर्धा दिल्लीच्या एम पी एल स्पोर्ट्स फाउंडेशनने प्रायोजित केले आहेत तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सह प्रायोजक आहे.चितळे डेअरी,जैन इरिगेशन जळगाव,एच टू इ सिस्टीम पुणे व फिरोदीया ग्रुप,अहमदनगर हे सहयोगी प्रायोजक आहेत.
    आघाडीवर असणाऱ्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर मुंबईच्या आशना मखीजाची विजयी घोडदौड आज संपन्न झालेल्या सहाव्या फेरीत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स हिने रोखली. सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या व अतिशय चुरशीने झालेल्या या पहिला पटावरच्या लढतीत दोघांनीही सुरुवातीस सावध चाली रचत डावात समतोल राखला. मध्यपर्वात मेरीने प्याद्याचे बलिदान देत आशनाला दडपणात ठेवले. वेळेच्या बंधनात अडकलेल्या आशनाला चकवा देत मेरीने विजय संपादन केला.
    दुसऱ्या पटावर अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल व महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर साक्षी चितलांगे यांच्यात क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइनने प्रदीर्घ काळ चाललेल्या अटीतटीच्या लढतीत वंतिकाने प्याद्याचे बलिदान देत धाडसी चाली रचल्या. परंतु साक्षीने वजीर व हत्तीच्या कल्पक चाली रचत ५१ व्या चालीला डाव बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.
    तामिळनाडूची महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री व महाराष्ट्राची गतविजेती महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांच्यातील डावाची सुरुवात कोले झोकेटार्ट प्रकाराने झाली. रंगतदार झालेल्या या लढतीमध्ये श्रीजाने अश्वाची चुकीची चाल रचल्याने दिव्याने हत्ती व उंटाच्या नेत्रदीपक चाली रचत राजावर जोरदार आक्रमण करत श्रीजाचा वजीर मिळविला व अखेर 35 व्या चालीला श्रीजाला डाव सोडण्यास भाग पाडले.
    पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन व तामिळनाडूची मानांकित खेळाडू संयुक्त सी. त्यांच्यातील लढत सिसिलियन नॉजदार्फ डिफेन्सने झाली. सुरुवातीपासूनच आक्रमकरीत्या खेळणाऱ्या सौम्याने उंटाचे बलिदान देत संयुक्ताला अडचणीत आणले. दडपणात खेळणाऱ्या संयुक्ताने 27 वी उंटाची चाल चुकीची केल्याने सौम्याने नेत्रदीपक चाली रचत वर्चस्व प्रस्थापित केले व 33 व्या चालीला विजय संपादला. अर्जुन पुरस्कार प्राप्त गोव्याची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर भक्ती कुलकर्णीला पश्चिम बंगालची महिला कॅन्डीडेट मास्टर ब्रिस्टी मुखर्जीने अटीतटीची लढत दिली. डच डिफेन्सने रंगलेल्या या डावात भक्तीने घोडा व उंट यांचा चातुर्याने उपयोग करत वजीराच्या मदतीने अचानकपणे ब्रिस्टीच्या राजावर जोरदार हल्ला चढविला व ब्रिस्टीचा बचाव नेस्तनाबूत करत भक्ती ने 41 व्या खेळीला विजय मिळवला.
    केरळची कल्याणी सरीन व आयुर्विमा महामंडळाच्या राधिका चवालीने आकर्षक रित्या खेळत महाराष्ट्राची महिला फीडे मास्टर भाग्यश्री पाटील व गुजराती अंजली सागर या मातब्बर खेळाडूंना बरोबरीत रोखत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements