‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’साठी आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा- डॉ.गायत्री हरीश
– डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात कार्यशाळा संपन्न
तळसंदे :- सप्लाय चेन व्यवस्थापनात यशस्वी होण्यासाठी वेळेवर निर्णय घेणे, सर्व घटकांमध्ये समन्वय साधणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. बाजारातील बदलांनुसार लवचिकता ठेवत ग्राहकांच्या गरजानुसार कार्यप्रणालीत बदल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन कौशल्य परिषदेच्या प्रमुख, चेन्नई येथील प्रसिद्ध तज्ञ डॉ. गायत्री हरीश यांनी केले.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित ‘सप्लाई चेन मॅनेजमेंट : कार्यक्षमतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गायत्री हरीश बोलत होत्या. व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
डॉ. गायत्री यांनी जागतिक स्तरावर सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये होत असलेले बदल आणि त्यात तंत्रज्ञानाची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, व्यवसायासाठी कार्यक्षम आणि अद्ययावत पुरवठा साखळी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. डेटा ॲनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुरवठा साखळी अधिक पारदर्शक, वेगवान आणि किफायतशीर बनवता येते. विद्यार्थ्यांनी भविष्यातील व्यवस्थापन प्रमुख म्हणून तंत्रज्ञान व विविध कौशल्ये आत्मसात करावी असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक, अधिष्ठाता डॉ. मुरली मनोहर भूपती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तळसंदे- डॉ. गायत्री हरीश यांचे स्वागत करताना डॉ. के. प्रथापन. समवेत सुजित सरनाईक, डॉ. मुरली मनोहर भूपती.