खोची ;भैरवनाथाच्या पाकाळणी पालखी सोहळ्याने चैत्र यात्रेची सांगता उत्साहात संपन्न
खोची,(वार्ताहर):- येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या पाकाळणी पालखी सोहळ्याने चैत्र यात्रेची सांगता झाली.हजारो भविकांनी पालखी सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती.
भैरवनाथ व जोगेश्वरीच्या जयघोषात,गुलाल खारीक खोबऱ्याच्या मुक्त उधळणीत यावेळी चांगभलचा गजर झाला.
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत व खोची ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री.भैरवनाथाची यात्रा १२ एप्रिलपासून सुरू झाली होती.ही यात्रा तीन टप्प्यात झाली .पंधरा दिवस चाललेल्या या यात्रेचा समारोप पाकाळणी यात्रेने झाला.तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात चैत्र पौर्णिमेला मोठा पालखी सोहळा व हलगीच्या तालावर नाचणार्या गगनभेदी सासनकाठ्या व आकर्षक व नयनरम्य आतषबाजीने मन मोहवून टाकणारे दृश्य पहावयास मिळाले.यावेळी कुलदैवत असणाऱ्या भाविकांनी श्रींना नैवेद्य अर्पण केला.यात्रेच्या दुसर्या टप्प्यात गावयात्रा साजरी करण्यात आली.या दिवशी श्री भैरवनाथाला ग्रामस्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.तसेच आज अमावास्या दिवशी भैरवनाथाची पाकाळणी यात्रा झाली.सकाळी श्रींची पूजा झालेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. दुपारी बारा वाजता “श्रीं” ची आरती झाल्यानंतर पालखीने मानाच्या अश्वासह मंदिराला प्रदक्षिणा घातली व पालखी सोहळा सुरु झाला.पालखी गाभाऱ्यातून बाहेर येताच भाविकांनी भैरवनाथ व जोगेश्वरीच्या नावानं चांगभल,काळभैरीच्या नावानं चांगभलच्या गजरात पालखीवर खारीक गुलाल खोबऱ्याची उधळण केली. पालखी सोबत गुरव,गोसावी,डवरी यांचेसह सेवेकर्यासमवेत पालखी सोहळा लवाजम्यासह वारणा नदीतीरावर आला. तत्पूर्वी सईच्या झाडाखाली असलेल्या श्री भैरवनाथाच्या मुळस्थानी “श्री”ची आरती करण्यात आली त्यानंतर वारणा नदी तिरावर उत्सव मूर्तीला स्नान घालण्यात आले परत पालखी सोहळा परतीच्या मार्गाला लागाला.पालखी पळवत मंदिराच्या आवारात आणण्यात आली. त्यानंतर भाविकांनी व महिलांनी उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले व गुलालात न्हाऊन घरी परतले.त्यानंतर उत्सवमूर्ती मंदिरात विराजमान झाली. यावेळी गुरव,गोसावी,डवरी समाजाने सर्व देवदेवताना श्रीफळ,नैवेद्य अर्पण केला