शाळेच्या ऋणातून उतराई साठी दिली ५१ हजारची देणगी ; पाराशर हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनीची दानत
नवे पारगाव : ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं ते ज्ञानमंदिर सदैव स्मरणात राहते. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण दातृत्व दाखवले पाहिजे असे मत पुणे महानगरपालिकेच्या जैव वैद्यकीय अधिकारी प्रियांका किरण भाळवणे यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील पाराशर हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी प्रियांका किरण भाळवणे यांनी ५१ हजारची देणगी देऊन शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य नंदकुमार यादव यांनी प्रियांका भाळवणे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
प्रियांका भाळवणे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपली शाळा आयुष्यात कधीही विसरू नये कारण बालवयात आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम शालेय जीवनातच घडत असतात. त्याच संस्काराच्या शिदोरीवर जीवनातील अनेक चढउतारावरती आपण यश मिळवत असतो.
यावेळी पाचवीची विद्यार्थीनी कु.रिधीमा विनायक पाटील हिने ‘आयटीएस’ या परीक्षेत जिल्हात प्रथम क्रमांक मिळविले बद्दल तिचा गौरव झाला. प्राचार्य यादव यांनी शाळेच्या इमारतीच्या डागडुजी करीता आजी-माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक, लोकप्रतिनिधी यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. पर्यवेक्षिका सुरेखा रोकडे, शिवाजी पाटील, प्रा.विनायक पाटील, रविंद्र बागडी, संभाजी भानुसे उपस्थित होते.