चिंचवाड येथे केएमटी बसला आग ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
कुंभोज / प्रतिनिधी(विनोद शिंगे):-करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे केएमटी बस सुरू करताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागली. यामध्ये केएमटीचे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले .ही घटना ग्रामपंचायत चौकात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बुधवारी बारा वाजताची गंगावेश कोल्हापूर ते चिंचवाड हि बस क्रमांक एम एच 09 सी व्ही 394 विद्यार्थी व प्रवासी घेऊन चिंचवाड येथे पोहोचली. त्यातील प्रवासी उतरल्यानंतर दहा मिनिटांनी काही प्रवासी कोल्हापूरला जाण्यास बस मध्ये बसले. बसचे ड्रायव्हर संतोष बुचडे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला पण अचानक इंजिन मधून धूर येऊ लागला. ही घटना वडाप वाहतूक करणारे रिक्षावाले इम्तियाज शेख यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ चालकाला ही कल्पना दिली. चालक यांनी खाली उतरून पाहिले असता बस मध्ये शॉर्टसर्किट झाले होते. आणि आग लागली होती. बघता बघता आगीने रुद्र रूप धारण करत बसणे पेठ घेतला. शेजारी असलेल्या चावीच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न झाला. पण तो निरर्थक ठरला. यावेळी सरपंच श्रद्धा प्रशांत पोतदार, पोलीस पाटील रवी कांबळे, उपसरपंच धन्यकुमार पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार ,दीपक मगदूम यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलेली आग विझवण्यासाठी परिसरातील पाण्याचा वापर केला. पण आग आटोक्यात येत नव्हती. रवी कांबळे यांनी अग्निशामक दल तसेच पोलीस प्रशासनाला याबाबतची कल्पना दिली. कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दल आणि गांधीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ काही वेळातच घटनास्थळी येथे दाखल झाले . तसेच के एम टी चे कॅश अधीक्षक नितीन पवार, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, वर्क मॅनेजर दीपक पाटील, यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत बस जळून खाक झाली. यावेळी ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.