जरांगे-पाटलांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा लढण्यास तयार -राजा माने
जरांगे-पाटील यांच्याशी आंतरवालीत राजा मानेंची चर्चा
आंतरवाली-सराटी,दि.२४:- बार्शी विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे नाव मनोज जरांगे-पाटील गोटातून पुढे आल्याची चर्चा सुरु असताना काल मध्यरात्री आंतरवाली सराटी येथील सरपंचाच्या मळा परिसरात राजा माने यांनी मराठा समाजसेवक जरांगे-पाटील यांची भेट घेतली.राजकारण हे आपले कार्यक्षेत्र नाही तथापि मराठा संपादक म्हणून मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी राजा माने यांनी दर्शविली.आजवरची त्यांची निःपक्ष व परखड पत्रकारिता आणि बार्शी तालुक्यासंदर्भातील त्यांची भूमिका त्यांनी जरांगे-पाटील यांच्यापुढे मांडली.यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित असलेले डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे राज्य सचिव व डिजिटल पुणे न्यूजचे संपादक महेश कुगावकर , संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व “द इंडिपेंडंट व्हॉइस”चे संपादक अमोल पाटील यांनी डिजिटल मिडियाच्या राज्यभरातील यंत्रणेची माहिती जरांगे-पाटील यांना दिली.राजा माने यांनी मांडलेल्या भूमिकेसंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेवू ,असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.