सातवे हायस्कूल व गर्ल्स मध्ये भरला वैष्णवांचा मेळा
बच्चे सावर्डे ,(प्रतिनिधी):- सातवे येथील प.पू.डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित ,सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल मध्ये आषाढी वारी दिंडी सोहळ्यानिमित्त विद्यालयात भरला वैष्णवांचा मेळा. आज मंगळवारी विद्यालयात आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळ्याचे नियोजन विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विठ्ठल रखुमाई यांच्या पालखीचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक कांबळे व गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका
सौ.चोकाककर मॅडम यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक प. पू.डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास वारणा न्यूज चे संपादक श्री.सुनिल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता या रिंगण सोहळ्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून वारकरी संप्रदायाची पताका जणू खांद्यावर घेऊन भारतीय अध्यात्म किती श्रेष्ठ आहे , परमेश्वरा प्रति श्रद्धा व निष्ठा असणं गरजेच आहे हे दाखवून दिलं. यावेळी भजन ,ओव्या गायन करण्यात आले. विठ्ठल रखुमाई -विठोबा रखुमाई या तालावर दिंडी पताका व तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन रिंगणामध्ये फेर धरून मनोभावे विठ्ठल भक्तीत दंग झालेल्या विद्यार्थिनी तसेच डोक्यावरती विठ्ठल रखुमाई ची मूर्ती , समृद्धीचे प्रतीक मानला जाणारा कळस घेऊन या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या अनेक विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल -विठ्ठल करत या वारीचं श्रेष्ठत्व सिद्ध करत होते. रिंगण सोहळ्यामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी झिम्मा फुगडी घालत फेर धरला होता . त्यांच्या साथीला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा तल्लीन होऊन विठुरायाचा गजर करत होते. अशा या भक्तीमय वातावरणात विठुरायाचा जयघोष करत शाळेतील रिंगण सोहळा पार पाडून हा बालचमुंचा वैष्णव मेळा सातवे गावामध्ये प्रभात फेरीसाठी मार्गस्थ झाला गावातील शिवाजी चौकात या विद्यार्थ्यांनी अनेक गावकऱ्यांच्या साक्षीने रिंगण सोहळा हा नेत्र दीपक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमांमध्ये तितक्याच उत्साहाने शिक्षक व पालक वर्ग सुद्धा सहभागी झाले होते. या रिंगण सोहळ्यामध्ये विठ्ठल रखुमाईचा वेश परिधान केलेले विद्यार्थी साक्षात विठ्ठल रखुमाई होऊन या दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसोबत हाती पताका घेऊन मनोभावे नृत्य करताना दिसत होते. दिंडी सोहळ्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण विद्यालयाच्या वतीने देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांच्या सोबतच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.