अंबप फाटा : पुणे-बेंगलोर महामार्गावर दोन कि.मी.रांगा ; वाहतूकीची कोंडी
अंबप,(किशोर जासूद):- पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथे मालवाहतुकीचा ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊन महामार्गावर सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रविवारी पहाटे हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथील राजेश मोटरजवळ तामिळनाडूहून रत्नागिरीला जाणारा ट्रकचा रॉड तुटल्याने रस्त्यावर बंद पडल्याने एकेरी वाहतूक होत होती. रविवारी महामार्गावर वाहतूक अधिक प्रमाणात असते. बंद पडलेला ट्रक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच होता. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. अंबप फाट्याच्या मागे महात्मा फुले मिलपर्यंत वाहनांच्या महामार्गावर मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अंबप फाटा येथील उड्डाणपुलाचे कामही गेल्या कित्येक दिवसापासून रेंगाळले आहे. जवळच असणाऱ्या शिरोली एमआयडीसी येथील औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात या पट्ट्यात असते. त्यामुळे वाहतूक कोंडी सायंकाळी अधिकच झाली होती.