नवे पारगाव येथे तीन ठिकाणी चोरी,
चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील पाराशर नगरातील तीन घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केली. घटना शनिवारी मध्यरात्री झालेल्या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली.
घटनास्थळा वरून मिळालेली माहिती ; तळसंदे – नवे पारगाव दरम्यान पाराशरनगर येथील सुहास डोईजड यांच्या घरात राजीव विलास कदम भाड्याने राहतात. पती-पत्नी शिक्षक उन्हाळी सुट्टी साठी निपाणीला गेले होते. राजीव कदम यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यानी तिजोरीतील रोख आठ हजार चोरले. दुसऱ्या गल्लीत तानाजी विलास जाधव राहतात. नातेवाईकांचे निधन झाल्याने हे कुटुंब कोडोलीला गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीतील पाच तोळ्याचे दागिने चोरट्याने चोरले. जाधव यांच्या घरा जवळ कृष्णात शंकर साळुंखे कुटुंब राहते. ते परगावी गेले होते. चोरट्याने साळुंखे यांच्या घराचे कुलूप तोडले. तिजोरीतील एक तोळ्याची सोन्याची चेन, तीन ग्रॅमची अंगठी व चांदीचा दागिना चोरला.
चोरीची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी चोरीची माहिती घेतली. श्वानपथक व ठसे तज्ञ यांनीही तपास सुरू केला आहे.