Home Breaking News इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु:- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु:- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

Advertisements

इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु:- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

Advertisements

*713 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण

 

इचलकरंजी (कोल्हापूर) दि. 23 : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. त्यांच्याहस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण संपन्न झाले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उप विभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगुले उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झाले, तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली.

यात 130.60 कोटी रुपयांच्या केंद्र शासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना (UIDSSMT) अंर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागासाठी भूयारी गटार योजना राबविणे व 18 द.ल.ली. क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, 488.67 कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाभियान अंतर्गत अस्तित्वातील भूयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन, 31.37 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणे, पंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इ. कामांचे उद्घाटन, 59 कोटींच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन, 4 कोटींच्या शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन, तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.

याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 4 हजार 200 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप तर 5 हजार बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी पत्राचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.

*विमानतळावर स्वागत*
तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर पर्यटन पुस्तिका भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

Advertisements
Advertisements