पंचगंगा नदीपात्र धोकादायक; नागरिक मंचाची सपाटीकरण व दुरुस्तीची मागणी
इचलकरंजी :- शहरातील पंचगंगा नदीघाटावर नुकताच एक युवक पोहत असताना बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देत नदीपात्राचे तातडीने सपाटीकरण (लेव्हलिंग) व घाटाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
नागरिक मंचाच्या शिष्टमंडळाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी निरीक्षणात आणले की, घाटाच्या समोरील बाजूस नदीपात्रात गाळ काढल्यामुळे मोठी खोलजागा निर्माण झाली आहे, तसेच बंधाऱ्याच्या डाव्या बाजूस पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पोहणाऱ्यांना अंदाज न आल्यामुळे धोका निर्माण होत आहे. याठिकाणी डबरा निर्माण झाल्याने पाण्याची खोली अधिक असून अनेकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे भविष्यात आणखी दुर्घटना होऊ नयेत म्हणून नदीपात्र सपाट करणे व धोका असलेल्या भागांवर सूचनाफलक लावणे गरजेचे असल्याचे नागरिक मंचाने निवेदनात नमूद केले आहे.तसेच, गाळ काढताना संस्थानकालीन घाटाचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचेही मंचाने स्पष्ट केले.
हे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांच्याकडे देण्यात आले. यावेळी इनामचे उदय चव्हाण, महेंद्र जाधव, उदयसिंह निंबाळकर, राजू कोंन्नुर, अमित बियाणी, हरीश देवडिगा, अभिजित पटवा उपस्थित होते.नदीपात्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.