अभिषेक खोत यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार साठी निवड…
अंबप,प्रतिनिधी(किशोर जासुद):- कासारवाडी ता. हातकणंगले येथील अभिषेक खोत यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 साठी निवड, २५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम संपन्न होणार.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक नाव जोमाने पुढे येत आहे ते म्हणजे अभिषेक बाबासो खोत. गेली पंधरा वर्षे सातत्याने मराठी चित्रपट, लघुपट, अल्बम गीत, वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे एक अत्यंत संवेदनशील, मेहनती आणि नवदृष्टी असलेले दिग्दर्शक आहेत. अभिषेक खोत यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने अभिषेक खोत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांनी स्थापन केलेली A.B.R.K. फिल्म ही संस्था आज स्वतःचे स्वतंत्र बॅनर म्हणून उभी असून, या संस्थेच्या माध्यमातून ६०० हून अधिक कलाकार सभासद आहेत. अभिषेक खोत यांनी अनेक मराठी चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. त्यातील काही प्रमुख चित्रपट म्हणजे तरुण तुर्क म्हातारा आर्क, अण्णागिरी, उतावळा बबलू, कांदा पोहे या चित्रपटांतून ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि विनोदी पट अशा विविध अंगांना हात घालणारे विषय हाताळले गेले आहेत. सामाजिक भान असलेल्या आणि वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या लघुपटांनीही विशेष लक्ष वेधले आहे. त्यामध्ये दुष्काळ,भेग,थेंब हे लघुपट समाजातील समस्या अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडतात. त्याचबरोबर मराठी लावणी आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. पाव्हणं आज वाढली या थंडी – मराठी लावणी, उदो उदो करू चलाओ आई अंबाबाईचा – मराठी भक्तीगीत, गावात आली कळी चार चौघे झाली खुळी – या वेब सिरीजमधून त्यांनी ग्रामीण वातावरणातील विनोदी बाजू मांडली आहे.
आजवर ३२ हून अधिक पुरस्कारांचे मानकरी असलेले अभिषेक खोत यांनी आपल्या गुणवत्तेने आणि मेहनतीने चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आहे. २०२१ ते २०२५ या काळात दरवर्षी A.B.R.K. फिल्म फेअर अवॉर्ड सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. या सोहळ्याच्या माध्यमातून नवीन कलाकारांना व्यासपीठ, सन्मान आणि प्रेरणा मिळते. सध्या त्यांचा नवीन मराठी चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या चित्रपटाची तयारी जोमाने चालू असून, चाहत्यांना नव्या चविष्ट कलाकृतीची उत्सुकता लागली आहे.
अभिषेक बाबासो खोत हे फक्त दिग्दर्शक नाहीत, तर उद्योजक, कलाकार घडवणारे मार्गदर्शक आणि सामाजिक भान ठेवणारे संवेदनशील चित्रकर्ते आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा..! त्यांच्या उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.
“A.B.R.K. फिल्म – नव्या प्रतिभेला व्यासपीठ, आणि मराठी सृष्टीस सशक्त दिशा..!”