मोबाईल फोनच्या आकाराचा ट्युमर काढत जीवनदान
काँगोतील २८ वर्षीय रुग्णावर डॉ.अभिनव देशपांडे यांच्याद्वारे यशस्वी कर्करोग शस्त्रक्रिया
नागपूर : नागपूरमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अत्यंत जटिल आणि धोकादायक अशा कर्करोगाच्या प्रकरणात मोठे यश मिळवत एक २८ वर्षीय विदेशी रुग्णाला जीवनदान दिले आहे. काँगो (Democratic Republic of Congo) येथील जॉन या रुग्णाच्या खालच्या जबड्यात मोबाईल फोनच्या आकाराचा ट्युमर होता. तब्बल १५ सेमी x ८ सेमी एवढ्या मोठ्या ट्युमरची आठ तासांच्या शस्त्रक्रियेत यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णाच्या जबड्याचा ट्युमर हा चौथ्या स्टेजमधील मुखाच्या कर्करोगामुळे झाला होता. या प्रकरणात डॉ. अभिनव देशपांडे (संचालक, सर्जिकल ऑन्कोलॉजी व रोबोटिक ऑन्को सर्जरी विभाग) आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या टीमने मिळून ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली.
डॉ. देशपांडे यांनी यापूर्वी रुग्णाच्या ओळखीच्या व्यक्तीवर देखील यशस्वी कर्करोग उपचार केले होते, त्यामुळे त्यांनी नागपूर गाठले. रुग्णाला डाव्या गालावर गाठ, जास्त लाळ येणे, दातांमध्ये वेदना आणि तोंड उघडता न येणे अशी लक्षणं होती. एक महिन्यापासून ते अर्धवट द्रव आहारावर होते.
शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना डॉ. देशपांडे म्हणाले, “ट्युमरचा आकार मोठा आणि झपाट्याने वाढणारा होता. आमचे उद्दिष्ट होते संपूर्ण कर्करोग टाळणे आणि रुग्णाच्या खाण्या-बोलण्याच्या क्षमतेचे रक्षण करणे.”
शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. श्रीधर पिल्लेवान आणि डॉ. तरुण देशभरतार यांच्या नेतृत्वाखालील टीमने रुग्णाच्या पायातील हाड वापरून खालचा जबडा पुन्हा तयार केला. शस्त्रक्रियेनंतर दहाव्या दिवशी रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, तो सध्या ऍडजुवंट केमोथेरपी घेत आहे.
रुग्ण आता सामान्य आहार घेत आहे आणि त्याचे बोलणेही सुधारले आहे. “ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. यातून रुग्णाला नवीन जीवन मिळाले आहे,” असे मत डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केले.
ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रातील यश नव्हे तर नागपूर शहरासाठीही एक अभिमानाची बाब ठरली आहे.