अवकाळी पावसाने वडगावसह परिसरात मोठे नुकसान ;
किणीच्या मराठी शाळेचे पत्रे उडून गेल्याने लाखोचे नुकसान
वाठार, प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):- हातकणंगले तालुक्यातील वाठार, किणी,घुणकी, अंबप,चावरे,पेठ वडगाव ,तळसंदे, पारगाव सह परिसरात मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट मुसाळधार पाऊस, गारासह झालेल्या अवकाळी पाऊसासह मोठया प्रमाणात झालेल्या वादळामुळे वाठार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 रस्त्यावर लगत असणारे मोठमोठे होर्डिंग, हॉटेलच्या बाहेर लावलेले डिजिटल बोर्ड पडून तसेच अनेक जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. त्याच बरोबर किणी येथील प्रताप मराठी शाळेच्या तीन वर्गावरील पत्रे उडाले असून एका वर्गात असणारे संगणक फुटले आहेत त्याच बरोबर ऑफिस साहित्य याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या शाळेच्या परिसरातील आठ ते दहा लोकांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून गेल्याने त्या शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान झाले आहे त्याच बरोबर रस्त्यालगत असणारी ट्रॅक्टर ट्रॉली वाऱ्याच्या प्रचंड वेगाने पलटी होऊन तिचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
पेठ वडगाव शहरात वदळी वारा सुटल्यावर विद्युत पुरवठा खंडीत झाला त्यामुळे पाऊस पडून देखील रात्री नागरिक उकाड्याने हैराण झाले, रात्री साडेबारा नंतर शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला.
तसेच अनेक विद्युत खांब, झाडे उमळून पडली आहेत वादळी वाऱ्यासह प्रचंड वेगाने आलेल्या पावसाने वाठारसह अंबप मधील शेतकऱ्यांचे शाळू, गहू पिकाचे तसेच वैरणीचे ही मोठे नुकसान झाले आहे.