सतत शिकत रहिल्यास यश, प्रगती निश्चित- मायक्रोसॉफ्टचे गणेश आणेकर यांचे प्रतिपादन ;डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात मार्गदर्शन
तळसंदे :चांगल्या करिअरसाठी आणि स्वत:च्या प्रगतीसाठी सतत नवनवीन कौशल्ये, तंत्रज्ञान शिकत राहणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाबरोबरच इंटरनॅशनल सर्टिफिकेशन देखील महत्वाचे आहे. सॉफ्टवेअर अभियंत्यांसाठी भविष्यामध्ये अगणित संधी उपलब्ध असून जीवनभर शिकत रहिले तर आपली प्रगती कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे आशिया विभागाचे वरिष्ठ प्रोग्राम व्यवस्थापक गणेश आणेकर यांनी केले.
डी. वाय. पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे येथे ‘२०२५ आणि भविष्यातील सॉफ्टवेअर अभियंत्यांसाठी करिअर संधी’ या विषयावर आयोजित अतिथी व्याख्यानात ते बोलत होते. स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ.जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक, सहअधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आणेकर यांनी सॉफ्टवेअर अभियंत्यांसाठी उपलब्ध असलेल्या सध्याच्या आणि भविष्यातील संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी अनुभव हाच सर्वोत्तम शिक्षक आहे, जीवनभर शिकत राहा, परिश्रम घेतल्यास प्रत्येक जण प्रगती करू शकतो असे सांगत ‘घोडा बनण्यापेक्षा, जॉकी बना’ या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी अंगीकारण्याचा सल्ला दिला.
कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, एज कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन, एआर/व्हीआर सारख्या नव्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रांची माहिती दिली. उद्योग क्षेत्रात या तंत्रज्ञानांचा कसा उपयोग केला जात आहे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींवर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील आधुनिक ट्रेंड, भविष्यातील नोकरीच्या संधी आणि सतत शिकत राहण्याचे महत्त्व यांची सखोल माहिती मिळाली.
प्रदीप पाटील यांनी आभार मानले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फोटो ओळी
तळसंदे- गणेश आणेकर यांचे स्वागत करताना प्रा. डॉ. के. प्रथापन व प्रा. डॉ. जयेंद्र खोत.