महिला संशोधकांना पाठिंबा देऊन मानवी कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करा- डॉ.तेजस्विनी देसाई
पेठ वडगाव : महिला शास्त्रज्ञांनी विज्ञानावरील निष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचा विचार, व मानवी कल्याणाचा ध्यास या जोरावर आपले संशोधन पूर्ण केले व नोबेल पारितोषिकालाही गवसणी घातली. परंतु आजही संशोधन क्षेत्रात महिलांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसते. ती वाढणे व अधिकाधिक महिला संशोधक निर्माण होणे एकूणच मानवी कल्याणासाठी आवश्यक असल्याचे मत डॉ.तेजस्विनी देसाई, के.आय.टी. कॉलेज, कोल्हापूर यांनी व्यक्त केले. त्या पेठ वडगाव येथील श्री विजयसिंह यादव महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “इंटरनॅशनल डे ऑफ वुमन्स अँड गर्ल्स इन सायन्स” दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.अशोक चव्हाण हे होते.
डॉ. तेजस्विनी देसाई यांनी या कार्यक्रमात महिला संशोधकांना प्रोत्साहन देण्याची गरज विशद केली. त्यांनी सांगितले की, महिला त्यांच्या चिकाटी, समर्पण व प्रामाणिकपणामुळे उत्कृष्ट संशोधक बनू शकतात. इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्रातही त्यांना पुरेसा वाव मिळाला पाहिजे. यासाठी सरकारने महिला संशोधकांना अतिरिक्त सहाय्य व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांनी यावेळी नोबेल पारितोषिक विजेत्या महिला संशोधकांच्या कार्याची झलक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक चव्हाण यांनी भारतीय महिला वैज्ञानिकांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, मानवी जीवनाच्या इतिहासाचा मागोवा घेता विज्ञान, वैज्ञानिक संशोधन व शैक्षणिक विश्वात महिलांनी स्वतःला प्रत्येक काळात सिद्ध केले आहे. तरीही आजही एक महिला म्हणून त्यांना या क्षेत्रात अडथळे येतात. मानवी कल्याणासाठी विज्ञानाचा योग्य वापर व्हावा यासाठी सर्व समाज घटकांनी महिला संशोधकांना पाठिंबा द्यावा व विद्यार्थिनींनी संशोधन क्षेत्रात रुची दाखवून स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भौतिकशास्त्र विभागाने एक विज्ञान प्रदर्शनही आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. तेजस्विनी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. संदीप पाटील, भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ सदस्य डॉ. सचिन पवार यांच्यासह इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेले सुमारे ३२ मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आली होती. स्वागत व प्रास्ताविक प्रा. भाग्यश्री सुतार यांनी केले, पाहुण्यांची ओळख डॉ. सचिन पवार यांनी केली तर प्रा अविनाश लाडगावकर यांनी आभार मानले.. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षास जल अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.