घुणकीत मंगरायासिध्द दैवताची यात्रा उत्साहात संपन्न
नवे पारगाव : घुणकी (ता.हातकणंगले) “मंगरायासिध्दच्या नावानं चांगभलं च्या जयघोषात, भंडाऱ्याच्या उधळणीत, ढोलांच्या गजरात, भाविकांच्या अमाप उपस्थितीत येथील ग्रामदैवत मंगरायासिध्द यात्रा सलग दोन दिवह पार पडली. तब्बल बारा तास दैवताच्या मुर्तीची पालखी मिरवणूक सुरू होती. गावातील मुख्य मार्गावरून देवमाळीत काल (रविवारी) सकाळी ११ वाजता विसावल्यानंतर यात्रेची सांगता झाली. वडगाव परिसरात असलेल्या घुणकी येथील गेले दोन दिवस पुजा अर्चा, देवदर्शन, नैवेद्य असे विविध धार्मिक विधी, सासनकाठ्यांचे नृत्य, बालकांना उधळणे असे कार्यक्रम झाले. सायंकाळी ढोलांच्या गर्जनेत, भंडाऱ्याच्या उधळणीत श्रींची प्रदक्षिणा निघाली.
रात्री ओव्यांचा कार्यक्रम झाला तसेच सायकल, सिंगल घोडा शर्यंती झाल्या. सायंकाळी कुस्त्यांचे मैदान झाले. रात्री मंदिरातून दैवताच्या मुर्तीची पालखी निघाली. शनिवारी रात्री निघालेली पालखीची मिरवणूक मारुती मंदिरापासून गावातील मुख्य मार्गावरुन रविवारी सकाळी अकराच्या सुमारास देवमाळीत विसावल्यानंतर यात्रेची सांगता झाली.