“अवयवदान म्हणजे अमूल्य जीवनदान” – योगदान पोर्टल व पर्व संस्थेच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद, पत्रकार किशोर जासुद यांचा मोहिमेत पुढाकार
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- “अवयवदान म्हणजे अमूल्य जीवनदान” या प्रेरणादायी विचारांसह योगदान पोर्टल व पर्व शैक्षणिक विश्वस्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या अवयवदान मोहिमेला संपूर्ण भारतभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. शैक्षणिक विश्वस्त संस्था प्रमुख प्रवीण वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. सागर शेळके यांनी या मोहिमेत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
पत्रकार किशोर बाबासो जासुद (रायगड स्वाभिमानी, कार्यकारी संपादक) यांनी या मोहिमेत पुढाकार घेत अवयवदानासाठी अर्ज भरला आहे. अंबप ता हातकणंगले (जि. कोल्हापूर) हे त्यांचे मूळ गाव असून, त्यांनी “अवयवदान हे केवळ दान नसून, ते दुसऱ्या व्यक्तीला नवजीवन देण्याचे कार्य आहे,” असे म्हणत समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी निर्णयाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
अवयवदानाबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी योगदान पोर्टल व पर्व संस्थेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. “एक अवयवदान अनेक आयुष्यांना संजीवनी देऊ शकते,” असे सांगत आयोजकांनी समाजातील प्रत्येकाला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नागरिक या मोहिमेत सहभागी होत असून, पत्रकार किशोर जासुद यांच्या योगदानामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक विचारांचे बीजारोपण होत आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.