Home क्रिडा महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सायकलिंगमध्ये सुवर्णभरारी, कोल्हापूरमधील पैलवानाच्या कन्येचे यश

महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सायकलिंगमध्ये सुवर्णभरारी, कोल्हापूरमधील पैलवानाच्या कन्येचे यश

Advertisements

 

महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सायकलिंगमध्ये सुवर्णभरारी,  कोल्हापूरमधील पैलवानाच्या कन्येचे यश

Advertisements

 

 

रुद्रपूर : उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला.

डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने तीस किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली. टाईम ट्रायल म्हणजे पूजा असेच समीकरण सायकलिंग मध्ये मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावातील खेळाडू पूजा हिने आजपर्यंत मुलींच्या 14, 16 व 18 वर्षाखालील गटात तसेच वरिष्ठ महिलांच्या गटात याच क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने सुवर्ण पदकांचीच कमाई केली आहे. आजही तिने सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत वेळ व वेग या दृष्टीने योग्य नियोजन केले होते त्यामुळेच तिला येथे पुन्हा विजेतेपदाचा मान मिळाला. पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला असून ही कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी ऊर्जा देणारी असल्याचे पूजाने पदकवितरणानंतर सांगितले.

पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. मात्र तिला फारशी कुस्तीची आवड नव्हती सुरुवातीला तिने ट्रायथलॉन मध्ये करिअर करण्याचे ठरविले होते मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर आणि सहकार्याने तिने सायकलिंग मध्ये करिअर सुरू केले. 2016 मध्ये तिने ज्येष्ठ प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंगचा प्राथमिक ज्ञान आत्मसात केले त्यानंतर तिने मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश पाहून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात तिची निवड झाली. तिला तेथे अनिल कुमार यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

आजपर्यंत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. ती इचलकरंजी येथील न्यू इंग्लिश स्कूल खंजिरे शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला आहे.

उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी ट्रायथलॉनमध्ये 2 सुवर्णपदके जिंकून महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली होती. 3 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र मणिपूर, हरियाणा पाठोपाठ तिसर्‍या स्थानावर आहे.

Advertisements
Advertisements