अभिजित पटवा यांची लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली लोक आंदोलन न्यासाच्या महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या उद्दिष्टांवर चर्चा झाली तसेच पुढील कार्याचा दिशादर्शक आराखडा तयार करण्यात आला.
अभिजित राजेंद्र पटवा यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड कार्याध्यक्ष कल्पना इनामदार यांनी जाहीर केली. सचिव अशोक सबन, खजिनदार दत्ता आवारी, अन्सार शेख, विकास गाजरे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा तालुकाध्यक्षांची निवड लवकरच केली जाईल आणि त्यांना राळेगणसिद्धी येथे नियुक्तिपत्र दिले जाईल. अभिजित पटवा गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून इचलकरंजी नागरिक मंच या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रभावी वापर करून भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
या बैठकीत अण्णा हजारे यांनी संघटनेचे महत्त्व आणि सामाजिक दबावगटाची आवश्यकता यावर सखोल मार्गदर्शन केले. संघटना समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्ती रोखण्यासाठी प्रभावी भूमिका बजावते. प्रभावी संघटना ही लोकशाहीला सक्षम बनवते तसेच शासकीय व्यवस्थेवर लोकांच्या मागण्यांचा दबाव आणून न्याय व सुव्यवस्था प्रस्थापित करते, असे अण्णांनी स्पष्ट केले.
पटवा यांच्यावर लोक आंदोलन न्यासाची बांधणी आणि जिल्ह्यातील समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निर्भीड व सडेतोड भूमिकेतून त्यांनी समाजहितासाठी सतत कार्य केले असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात संघटना बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.